आठवणींची साठवण

आपल्या मेंदूत बर्याच सुख दु:खाच्या आठवणी साठऊन ठेवल्या जातात. कळत न कळत त्या आठवणी कधी कधी बाहेर पडतात. काही आठवणी अविस्मरणीय असतात.आणि त्या आठवण्यात खूप आनंद वाटतो. साठऊन ठेवलेल्या आठवणी काही संधर्भात बाहेर पडतात. स्थळ ,एखादे गाणे ,काही वेळेस फोटो पाहातो तेव्हा त्यानुसार त्या त्या वेळांचे प्रसंग आठवतात.  आनंदीचे क्षण ,तसेच काही कठीण प्रसंग आपल्या जीवनात घडतात. प्रत्येक प्रसंगातून काही ना काही धडा मिळतो. आणि तो घडा फार महत्वाचा ठरतो.

हो. बर्याचश्या आठवणीतल्या अनुभवाने मी हा एक निष्कर्ष काढला. त्याचा मला खूप उपयोग होतो. मंत्र,तंत्र आणि यंत्र. मंत्राच्या तंत्राने यंत्र चालू ठेवणे. कधी कधी मन अस्वस्थ होते. काही सुचत नाही अश्या वेळी त्याचा उपयोग करते. थोडा वेळ एखादा श्लोक किंवा जप करणे ह्या मंत्राच्या तंत्राने आपल यंत्र चालू ठेवू शकतो. आणि मग मन शांत होत. आणि आपल काम चालू. मला ते “चल रे नव जवान ह्या गाण्यातली ती ओळ….तू आगे  बढे जा आफतसे लढे जा, आंधी हो या तूफान , फटता हो आसमान….रुक न तेरा काम नही चल ना तेरी शान….चल रे नव जवान..:. मला फार महत्वाची वाटते. लहान असताना पाहिलेला सिनेमा.  काही प्रसंगी ह्या गाण्याची आठवण येते.

रम्य ते बालपण. बालपणीच्या आठवणी खूप आनंद दायक असतात. आमच बालपण फार सुरळीत व आनंदी होत.

बालपणीचा काळ सुखाचा किती मजेचा हा अमुचा. ह्या काळात आपण उडू बागडू जशी पाखरे स्वैर अंतराळी. काही  काळजी नसते. पाखरा सारखं जीवन. ते सुजाता ह्या चित्रपटाच गाण आठवल  बचपन के दिन भी क्या दिन थे, उडते फिरते तितली बन .किति छान वाटत ते  बालपण. तो काळ फारच लहान आहे अस वाटत.

त्या वेळी म्हणजे आमच्या बालपणी  सुमारे१९३०शीत विजेचे दिवे नव्हते. कंदील होते. कंदील स्वच्छ करून, त्यात रॉकेल भरून ,वात चढऊन ठेवायच. हे करायला आम्हाला आवडायच. आता ते आठवल तर छान वाटतं. आता सर्व जग विजेवर चालतय. एक क्षण देखिल विजेशिवाय घालवणे कठीण झाले आहे.

आताची लहान मुले विडियो गेम्स खेळत बसतात, ते पाहून मला आमच्या लहानपणचे खेळ आठवतात. हुतूतू, खो खो, लगोरी वगैरे. गल्लीत सगळी  मुले मिळून खेळायच. खूप मजा. हे घरा बाहेरचे खेळ. आम्ही घरात पत्ते,केरम, बुद्धीबळ वगैरे. गल्लीतील सगळी मुले मुली मिळून खेळताना किती मजा वाटते. मोठे होता होता जबाबदारी पण वाढत जाते. शाळा ,अभ्यास छोट्या भावंडांना सांभाळणे वगैरे वगैरे. ह्या काळात बर्याच  गोष्टींच ज्ञान प्राप्त होत. शाळेतली शिकवण, घरातल उत्तम वातावरण आपल  व्यक्तित्व घडविते. आमचे आई वडीलच आमचे आदर्श होते. त्यांनी दिलेले धडे अद्याप आठवणीत आहेत. वडील नेहमी सांगत असत आपल्याकडे जे आहे व जितके आहे त्यातच समाधानाने राहावे. त्यामुळे  नेहमी संतुष्ट.   वडील नेहमी म्हणायचे ..जैशी स्थिती आहे तैश्यापरी  राहे. ह्या बोधाची अजून पर्यंत आठवण आहे.

आम्ही बहीण भावंडं सात जण. मिळून मिसळून होतो. सर्वांशी मिसळून वागण्याचा धडा घेतला. त्यामुळे समाधान वृत्ती. माझे वडील फार आनंदी वृत्तीचे होते. ते संगीतज्ञ होते.  कर्नाटक  व हिंदुस्तानी संगीत . त्यामुळे आम्हा सर्वाना  संगीताची आवड निर्माण झाली. गावात मोठ्या गायकाची उदा.अब्दुल करीम खान, बडे गुलाम अली खान ह्या सारख्यांच्या मैफीलीला आमचे वडील आम्हाला घेऊन जायचे. तेव्हा आम्हाला विशेष समजायच नाही. पण त्यामुळे संगीताची आवड आणि थोड ज्ञानही प्राप्त झाल. घरीच गायन शिकवायला गायन मास्तर येत होते.

आम्ही दक्षिण भारतीय ऐय्यर . आईवडिलांच  शिक्षण तामिळ व मल्याळम् मद्ये झाले. नोकरी करिता केरळाहून बाहेर गावी जावे लागले. बरीच वर्ष बिजापुरात होतो. आणि आमच शिक्षण मराठी माध्यमात झाले. कारण त्यावेळी  त्या गावी मराठी व कानडी माध्यमाचीच शाळा होती. आम्ही मराठी घेतल. आमची आजी आमच्या बरोबर होती. गंमत अशी कि तिला तामिळ व मलयालम् शिवाय दुसरी कोणतीच भाषा कळत नव्हती. त्यामुळे खूप मजा यायची.आजी फार छान होती. नेहमी जपमाळ  हाती असायचे व राम नामाचा जप चालू असायचा. मधूनच कोणाला तरी हाक द्यायची व जप  चालू. फार प्रेमळ होती. सासू सुनेच प्रेमळ नात मला अजून आठवतय.

जस जसे मोठे होत जातो आपल्या जीवनात खूप बदल आढळून येतो. हळू हळू एक एक जबाबदारी येऊ लागते. शाळा, अभ्यास, आई वडिलांना मदत, लहान  भावंडांना सांभाळणे  वगैरे. त्यातही किती आनंद….ही आठवण किती आनंदमय.

आमची शाळा. ए .के. गर्लस् हाय स्कूल. आमची फस्ट ब्याच. आम्ही ११च मुली. खूप छान होती शाळा. शिक्षक पण खूप चांगले होते.  शाळेतल्या आठवणी अजून ही आठवण्यात आनंद वाटतो.शाळेत शिकलेल्या काही कविता आठवण्यात खूप मजा वाटते. लहान मुलांना समजेल अश्या सोप्या शब्दात लिहिलेले असते. त्यावेळी आपण पाठ करतो.अर्थ समजो अगर न समजो. कविता पाठ होते.  त्या कविता पाठ असल्या तर आठवणीतल्या संग्रहात जमा होतात. अशीच एक कविता आळस ह्या विषयावर. किती छान वाटते पाहा.  ती कविता अशी आहे.

आताचे मग की उद्या ही परवा ,किंवा पुढे काम ते,एखादे दिवशी करूच अथवा, होईल होणार ते…

ऐसे बोलुनिया खुशाल बसणे, या दुर्गुणाला अशा,देती  आळस नाव जो करीतसे अत्यंत की दुर्दशा. १

गोडी नका हो धरू आळश्याची, खोटी असे खोड अतीच त्याची..मनुष्य होतो जरी बुद्धी मान,  आळस्य योगेच खुळ्या समान…

आणि पुढे थोडा उपदेश…    खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये शिवी कोणा देऊ नये, कोणासंगे भांडू नये…

गोड फार खाऊ नये, पाहिले ते मागू नये..चित्ती धरी  जो हे बोल , त्याचे कल्याण होईल..

किती सोप्या शब्दात हे सांगितले  आहे. मी ते आठऊन  कधी कधी मनातल्या मनात खुश होते. त्यातलं  बरचस मी लक्षात ठेवल आहे.

काही वेळा चर्चेचा विषय निघतो.  तेव्हाची राहाणी आणि आत्ताची राहाणी यात बदल. चर्चा केव्हा तरी झालेली असते. आपल्याला त्याची आठवण येते आणि हसू येत. लाकडाची चूल, नंतर कोळश्याची शेगडी, रॉकेलचा पंपाचा स्टोव, वतीचा स्टोव  शेवटी  ग्यासची शेगडी. आणि आता विजेवर चालणार्‍या  शेगड्या. हा वदल पाहातांना  किती तरी आठवणी  येऊन जातात.  मला आठवतय कसे आम्ही लाकडाच्या चुलीच्या राखेत चिंचुके, शेंगदाणे रताळ वगैरे भाजून घेत होतो.    प्रत्येक विषयात बदल दिसून येत आहे.   सिनेमाच्या तिकिटा करिता, रेल्वेच्या तिकिटा करिता, रेशनला  तासंतास रांगेत उभे राहावे लागायचे. आणि आता सर्व धर बसल्या कंप्यूटरने ऑन लाईनवर काम होतय.

सुमारे १९३० पासून आत्ता पर्यंत म्हणजे २०१९ पर्यंत होत आलेला बदल पाहण्याची व अनुभवायची संधी मला मिळाली.  माझा जन्म १९२४ .आता मला ९५ चालू.  मला कंप्यूटर  व फोनचा  उपयोग करता आल्यामुळे क्षणात संपर्क साधण्याची विद्या पण मिळाली.  आमच्या काळात पत्रानेच मजकूरांची देव घेव होत असे. त्वरित मजकूर तारेने. आता एका क्षणात रोज बातम्या मिळतात.  यूट्यूब आणि गुगुल मुळे हव ते शोधून काढता येते. जुनी गाणी, हवा तो चित्रपट पाहायला  मिळतो. जग किती बदलले आहे.

प्रवासाची वाहने…बैलगाडी पासून आकाशयान. आम्ही वसईत राहात असताना मुले सुट्टीत यायची. आणि त्यावेळी  सर्वाना टांग्यातून गावात फिरण्यात मौज वाटायची. अश्या किती तरी आठवणी. फार छान वाटतात त्या आठवणी.

साठवणीतून एक एक आठवण काढता काढता मारूतीच्या शेपटी सारख वाढतच जातय. म्हणून मी आता इथेच थांबवते.

 

 

 

एका गुराख्याचे गाणे

अहो मी गुराखी  आलो ,गुरे घेउनी चाराया….

राना वनामधून  ओढ्या नाल्या मधुन…

काटे कुटे बोचती लई पाया….. अहो मी गुराखी….१

माझी  रत्नी गाय , नवी व्याली हाय,

तिच दुध  लई गोड प्याया……. अहो मी गुराखी……२

ढवळ्या पोवळ्या बैला , तुम्ही कोठे गेला..

जीव दमला तुम्हा शोधाया……..अहो मी गुराखी ….३

मी इथला राजा , गुरे माझी प्रजा…

दही दुधाने  भरल्या हंड्या…..अहो मी गुराखी ….४.

अहो मी गुराखी आलो, गुरे घेउन चाराया.

————————-

हे गाणे आमच्या शाळेत एका मैत्रिणीने गायिले होते. नंतर मी ते शाळेच्या कार्यक्रमात करवून घेतल.

 

 

 

 

किसरूळचा शेतकरी…एक छोटिशी नाटिका

पूर्वी  ग्रामोफोन  रेकॉर्डवर  आम्ही गाणी ऐकत असू. कधी कधी काही छोटिशी नाटिकांची रेकॉर्डस् पण होती. अशीच एक आमच्याकडे ही “किसरूळचा शेतकरी” ची रेकॉर्ड होती. मला ती नाटिका आठवली. प्रौढ शिक्षणावर आधारित आहे. शाळेच्या कार्यक्रमात उपयोगी आहे.

किसरूळचा शेतकरी:

(If you’d like to listen to this, click here.)

दुपारची वेळ. शेतकरी शेतात काम करून थकले. जेवणाची वेळ झाली. सगळे एकत्र जमले. जेवणानंतर थोडी विश्रांती घेत गप्पा मारीत असताना, एकाने सुचवले, “होउद्या एक  लावणी, तेवढाच  विरंगुळा”. एक शेतकरी उठून म्हणाला….

“अस म्हणता,”

“ऐका तर.” असे म्हणून त्याने लावणी सुरु केली…”.टण् टण् ..टण्  ….हो  हो हो ….अर जी जी र जी….

अहो, किसरूळ खेड गाव कोल्हापूर जिल्ह्याला ,

सह्याद्रीच्या डोंगरच रहाणी, नदीच पाणी, हय त्या गावाला…हा. र र र र  हां हां  जी जी र जी…..|

जंगलात हुरडा, करवंद झाडी लयी दाट, गावात फणाचा आंबा केळीची शोभाची वारिती भेट…. हा. र र र र…ओहो जी जी र जी…

एक शेतकरी सरग्या भला, कामिना मैना संगतीला, शिरपती मुलगा एक त्याला, नांदतो श्यात पिकवून मोठ्या कष्टान त्याच गवाला…  हा र र र माझ्या मैने तुला… हा हा  जी जी ग जी….

इतक्यात एक शेळी म म करीत धावते आणि शिरप्या येतो ओरडत. हाक मारतो. “बाबा ए … बाबा… घरला चल् की आईनं भाकरी केली हाय.”

“बर बर आलोच औत सोडून तू हो म्होर.”  घरी येतो.

“आई , बाबा आला, आता वाढ की मला भाकरी. लयी भूक लागलिया” .

ती म्हणते, “ऊन पण काय  हो लागतया…”

शिरप्या “ए आई मला आणि जरा डांगर वाढकी”

“डांगर संपल कोरड्यासंग लाऊन लाऊन खाकी ते काय भात हाय होय?”.  एक धपाटा पाठीवर.

हळुच कारभार्‍याला म्हणते..” आऊंदा पीक पाणि चांगल आलय न्हव.”? कारभारी म्हणतो…”अग, औंदाच्या पिकाला नावं कोण ठेविल. सोळा आणे पिक आलय बघ.”

“अस्स मग मला पुतळ्या करायला हव्या. मला पुतळ्या करायला हव्या”अग पण ऐकून तरी घे.पिक आलय खर पण त्या सावकाराचे साठ रुपये कर्ज फेडायला नको का.ते काय न्हाई मला पुतळ्या  हव्या ..मला पुतळ्या …. अग पण….ते काय नाय.”

अग ऐकून तरी घे…. औदा पिकाला धारण नाही, कर्ज कसा मी फेडू ग बाई.

म्हणूनच  म्हणतो..”कारभारणे, मुंबईला जाण्याचा बेत मी ग केला..”

“अगबाई, ते कशाला?. मग मी पण तुमच्या संग मुंबईला येणार.”

“अग  रोजगार करून  साठविन पै पैशाला आणि पुतळ्या मग करीन माझ्या सजनीता ग …आ आ आ आ हो.”|

“मला नको पुतळ्या मी तुमच्या संग येणार, नको मला पुतळ्या.”

“ऐकून तर घे… माझ घरदार तू मंभाळून राही,

माझ घरदार तू मंभाळुन राही ग , धरला वनवास पैशाच्या पायी .. धरला वनवास पैशाच्या पायी ग..हॉ हॉ….आ हा .हा हा…”|

तो मुंबईला जातो. एक दीड महिना होतो.

कारभारणीला कळजी वाटते. ती गाते..”.कारभारी गेले म्हंबईला  महिना दीड झाला

बाजारात गेले , खुशालिचा खागुद न्हाई आला

शिरप्या सारखा रडतो काय सांगू त्याला ,घडी घडी सख्याची सई येती मला..

कुठ र्हात असल, कुठ जेवत असल कुठ झोपत असल..कुठ बसत असल

हाल होतात पोटाचे काई ग, धरला वनवास पैशाच्या पाई…. जी जी ग जी.”|

इतक्यात किसन्या    येतो हाका मारीत..”शिर्पया , मैने, अग कोण घरात न्हाई होय..?”

“अगबाई, किसन्या तू कवा आला म्हणाला

ह्यो आत्ताच यतोय म्हव का..अन्  माझ कारभारी रं..”?

“हं तुझा कारभारी व्हय, तो बसलाय तिकड पैसे कमवायला. ते काय न्हव बघ, अग ती वकिलांची घरं हायत म्हव ..कस खोर्याने पैसे ओढतात”

किसन्या गातो..”.लिवणार्यांची सारी कारवाई कारवाई, गोर्या गरीबांचा वाली कोणी म्हाई रे न्हाई

कवी मानवाचे बोल त्याच हाय बर मोल

एवढी विनंती जाहिराती हाई रे हाई, शिकल्यावाचून धडगत नाही रे नाही. हॉं हॉं ….आहा हा हा हा.|

——————————

सगळे शेतकरी खुशीने माना डोलवतात आणि हो हो म्हणून कबूल करतात कि आपण पण शिकायला जायला पाहिजे.

आणि सगळे आपापल्या कामाला निघून जातात.

 

 

आई

आई..

एक लहान मुलगा आपल्या आईचे वर्णन करतो. ही एक कविता आमच्या पाठ्यपुस्तकात होती. मला सहज  आठवली. लिहावे असे वाटले. ती कविता अशी आहे.

निज न ये तर ,गीत म्हणावे,

अथवा  झोके देत बसावे .कोण  करी हे जीवे भावे….ती माझी आई….१..

हसता मजला पाहुनी  हसते, मुके मटामट कितीतरी घेते,

परी अंतरी जी  त्रुप्त न होते… ती माझी आई….२..

रडवे माझे वदन बघोनी, भूक लागली हे जाणोनी…

कोण उगे करी  मज पाजोनी…..ती माझी  आई……३..

चालत असता पडलो पाहुनी,  उचलाया मज येई धाउनी..

गोंजारी  पोटाशी धरुनी… ती माझी आई……४…

स्मरण तुझ्या ममतेचे होई, तव उपकारा सीमा नाही….

कैसा होऊ मी उतराई. गे, माझी आई…५..

——————

 

 

 

 

 

 

 

 

 

“Little by little”

A poem,I learnt when I was studying in class seven or eight. 

Little by little the bird builds her nest, 
Little by little the sun sinks to rest,
Little by little the waves in their glee,
Smooth the rough rocks by the shore of the sea..||
Drop after drop falls the soft summer shower,
Leaf upon leaf grows the cool forest bower,
Grain heaped on grain forms the mountain so high..
That its cloud capped summit is lost to the eye...||
Minute by minute so passes the day,
Hour after hour years are gliding away,
Improve then the moments till life be past,
and little by little grow wise to the last..||  
           --------------


 

राजा नळ आणि हंस राज

राजा नळ आपल्या सुंदर उद्यानात सहल करीत  असताना एका तळ्यापाशी आला.त्या तळ्यात काही बदके व हंस विहार करीत होते. एक सुंदर सोन्याचा हंस फिरत फिरत राजा समोर आला.राजा पाहातच राहिला.हस पण राजाकडे टक लाऊन पाहात थोडा वेळ तिथे स्तब्ध राहिला. राजा जवळ आला व हळु हळु ह्ंसाला गोंजारू लागला.ह्ंस   किनार्यावर येऊन राजाजवळ बसला. थोड्या वेळाने हंस जाऊ लागला. राजाने त्याला धरून ठेवले.राजा सोडत नाही असे पाहून हंस राजाला म्हणतो… आता हा संवाद खालील कवितेत अश्या प्रकारे वर्णिले आहे. ही कविताही एक जुनी आठवणच आहे. ही कविता माझ्या शाळेच्या पाठ्य पुस्तकात होती.

राजा नळ आणि हंस (संवाद)

न  सोडी हा   नळ भूमि पाळ माते,   असे जाणोनि हंस वदे त्याते.|.

हंस हिंसा नच घडो तुझ्या हाते, सोड राया जाईन स्वस्थळाते…,||

जाग जागी आहेत वीर कोटी, भले झुंजारही शक्ती जया मोठी..|

तया माराया धैर्य घरी पोटी, पाखरू हे मारणे बुद्धी खोटी…||

वधुनी माझी ही कनक रूप काया, कटक मुकुटादिक भूषणे कराया…|

कशी आशा उपजली तुला राया ,काय नाही तुजला दया माया…||

म्हातारी उडता नयेची तिजला, माता मदीया अशी…|

कांता काय वदू नव प्रसव ती साता दिसाची तशी..|

पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजितसे..|

हातामाजी नृपा तुझ्या गवसलो ,आता करावे कसे…||

सदय ह्रदय याचे भूप हा ताप हारी,|

म्हणुनी परिसता मी होय येथे विहारी…|

मजही वध कराया पातकी पातला जो..|

वरुनी पती असा, ही भूमी कैसी न लाजो…||

येणे परी परिसता अती दीन वाचा,|

हेलावला नळ पयोधि दया रसाचा.|

सोडी म्हणे , विहर जा अथवा फिराया,|

राहे यथा निज मनोरथ, हंस राया….||

सुटुनी खग पळाला ,वैसला शालसाखे,|

क्षण भरी निज देही मुक्ती विश्रांती चाखे..|

स्वजन तव तयाचे भोवताली मिळाले,|

कवळती निज बंधु बाष्प बिंदु गळाले…..||

विसावा घे काही, उडुनी लवला ही परतला,|

नृपाळाच्या स्कंधी बसुनी मणिबंधी उतरला..|

म्हणे हंस क्षोणी पतिस तुज कोणी सम नसे,|

दयेचा हा ठेवा तुज जवळी देवा वसतसे….||

ऐक राया तू थोर दया सिंधु, नीति सागरही तूची दीन बंधु..|

निखंदोनी बोलिलो नको निंदु, तुझ ऐसा उपकार जया वंदु….||

हंस मिळणे हे कठिण मही लोकी, सोनियाचा तो नवल हे विलोकी…|

तशा मजलाही सोडिले तुवा की, तुझा ऐसा उपकार मी न झाकी..||.

किती रावे असतील तुझ्या धामी, किती कोकिल ही सारिका तसा मी..|

चित्त लागियले तूझिया लगामी, नृपा योजी मज आपुलिया धामी….||

हे पाखरू मजसी येयिल काय कामा, ऐसे  नृपा न वद पूरित लोक कामा….|

मोले उणे व्यजन ते धरिता पुढारी, छाया करी तपन दीप्तिस ही निवारी…||

——————————————————————-

असा संवाद झाल्या नंतर राजाला दया येते व राजा खुश होऊन हंस राजाला आपल्या धामी योजतो. हंस आनंदाने राजाबरोबर डुलत डुलत जातो.

मला ही कविता आवडली .मनुष्य आणि इतर प्राण्यातले स्नेह दिसून येते.

एका कोळ्याचा प्रयत्न.

एका कोळ्यचा प्रयत्न.

एकदा मी माझ्या मैत्रिणी कडे तिच्या गावी गेले होते.फार जुनी मैत्री आमची.लहानच पण छान घर होत.आम्ही आमच्या  इतर मैत्रिणी व शाळा ह्या विषयी गप्पा मारीत होतो. सहज माझ लक्ष भिंतीच्या एका कोपर्यात गेल. त्या कोपर्यात एक कोळी जाळे विणत होता.मी माझ्या मैत्रिणीला ते दाखविल. आणि आम्हा दोघीना शाळेत शिकलेली कोळ्याची कविता आठवली. ती म्हणाली “, तुला आठवते का ग त्या कोळ्यची कविता.?” मी म्हण्टल ,”हो मला पूर्ण आठवतय.”   मग आम्ही दोघी मिळून ती कविता म्हणालो.तीच कविता ..कोळ्यचा प्रयत्न..ती कविता अशी….

एका कोळियाने एकदा आपुले जाळे भांधियेले ऊंच जागी,

तेथुनी सुखाने खालती तो आला, परी मग झाला कष्टी बहू..

मागुती जाळिया माजी जाता येना, धाग्यावरुनी पुन्हा  पुन्हा पडे..|1|

चार वेळ तो ह्या परी पडे, जाय बापुडा भागुनी पुढे,

आस खुंटली येतसे रडे, आंग टाकुनी भूमिसी पडे.|2|

पाचही वेळा यत्न करुनिया आले यश न तयाला, ..

गरीब बापुडा, कोळी तेव्हा, दुक्खी अतिशय झाला..

हिम्मत धरुनी फिरुनी आणखी धागा चढुनी गेला,

परी जाळ्यामधी शिरताना तो झोक जाउनी पडला….|3|

“अहा, मज ऐसा दैव हत प्राणि,

खचित जगती या दिसत नसे कोणी..”

निराशेने बोलुनी असे गेला,

परी चित्ति स्वस्थता न .ये त्याला…|4|

मग वेगे वेगे ऊठे, धागा चढू लागे नेटे,

बहू घेयी खबरदारी, जाई पोचे  जाळ्यावरी..

हळुच मग आत शिरे, पोटी आनंदाने भरे.

झटे निश्चयाचे बळे,  अन्ती त्याला यश मिळे..|5|

आम्हा देघीना कविता पूर्ण आठवल्याने खूप आनन्द झाला. मग आम्ही  आणखी कविता आठवू लागलो.

शुभेच्छा..

प्रथम” गुडी पाडवा” शुभेच्छा!!. वर्श सुखासमाधानाचा जावो.

आज तामिळ नव वर्श.. विशु. त्यांना पण नव वर्श शुभेच्छा.!!